आयुष्याचा किंवा दैनंदिन जीवनाचा एक क्रम असतो , याच क्रमाला आपण "रुटीन" असे म्हणतो. उद्या सकाळी उठून काय करणार आहे आहे तर मी ऑफिसला जाणार आहे त्याच्या नंतर मी दिवसभर ऑफिसमध्ये काम करणार, संध्याकाळी घरी येणार,घरी आल्यावर मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवणार किंवा बराच वेळ मोबाईलमध्ये डोकं घालून बसणार. रात्री जेव्हा निद्रादेवी प्रसन्न होईल त्या वेळी झोपणार. सकाळी उठून पुन्हा तोच क्रम. हेच रुटीन बराच काळ चालत राहिले कि मग त्याचा कंटाळा येतो. आपल्याला कुठल्याच गोष्टीत रस वाटत नाही.गोष्टींचा कंटाळा येतो. आयुष्यात एक्सायटिंग असे काही रहात नाही आणि त्यामुळे मग आपली मानसिक स्थिती खराब होत जाते. आयुष्य निरस होत जाते.
मग यावर उपाय काय??? तर आपणच स्वतःला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवायचे. वेगवेगळी आणि नवीन आव्हाने स्वीकारायची, यामुळे आपले जीवन रुटीन राहता त्यात एक नेहमीच एक unknown पार्ट /uncertainty राहते.माझा जीवन असे एक्साइटेड बनवण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यासाठी दैनंदिन कामकाजा व्यतिरिक्त मी इतरही गोष्टी करतो जसे की मैदानावर खेळणे,व्यायाम, ट्रेकिंग, रॉक क्लिंबिंग, वेगवेगळी ठिकाणं शोधणे, ती फिरणे,वेगवेगळ्या देशांची नाणी गोळा करणे,लोकांशी मैत्री करणे.
असंच वेगळं काहीतरी करण्याची ही वृत्ती मला घेऊन गेली आयर्न मॅन स्पर्धेकडे. या स्पर्धेत तसा भारतीयांचा सहभाग कमी, परंतु परदेशात या स्पर्धेचे फॅड जबरदस्त आहे. साठीच्या घरातील तरुण , तीन अपत्य असणारी आई आणि अगदी अपंग व्यक्तीसुद्धा या स्पर्धेत सहभागी होत असतात. सुरुवातीला जेव्हा या स्पर्धेचे स्वरूप मी ऐकले त्यावेळी मला वाटले " ये अपने बस का काम नही है बॉस ". त्याचे कारणही तसेच होते म्हणा. ही स्पर्धा पूर्ण करायची म्हणजे 1.9km पोहायचे त्यानंतर 90 किलोमीटर सायकल चालवायची आणि त्यानंतर लगेच 21 किलोमीटर धावायचे. अगदी तुमच्यासारखेच " हे असे कुणीतरी वेडाच करू शकतो " याच मतावर मीही ठाम होतो. परंतु ही स्पर्धा पूर्ण केलेल्या माझ्या संदीप पाटील नावाच्या मित्राने मला समजावले की ही स्पर्धा तू ही पूर्ण करू शकतोस फक्त गरज आहे ती सरावाची. हे ऐकून मी त्याला म्हणालो "अरे सायकलिंग आणि रनिंग मी रडतखडत पूर्ण करेनही पण स्विमिंगच काय? इथे थोडं पोहलं की जगातला ऑक्सिजन संपतोय की काय या भीतीने जसा श्वास घेऊ तशी अवस्था होते. मग तिथे दोन किलो मीटर कसे जमेल मला?". यावर तो म्हणाला "अरे मी ज्यावेळी सराव सुरू केला होता त्यावेळी मला तर पोहताही येत नव्हतं. तुला निदान पोहता तरी येते. तू कर सुरु होईल सगळं बरोबर". आता हे त्याने खरे सांगितले की मला धीर देण्यासाठी पुडी सोडली हे देवच जाणे, पण त्याच्या या एका वाक्यावर विश्वास ठेवून मी या स्पर्धेची तयारी सुरू केली.
सुरुवातीला सर्वांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. कुठल्याही गोष्टीची(vit B12,Hb etc) काही कमतरता तर नाही ना? या स्पर्धेसाठी आपण पूर्णपणे झोकून देऊ शकतो ना? या शंकांचे निरसन करण्यासाठी या चाचण्या घेण्यात आल्या.साधारणपणे सलग तीन महिने आम्ही स्विमिन्ग,सायकलिंग आणि रुंनींग या तिन्ही प्रकारांचा सराव करत होतो. आठवड्याची विभागणी आम्ही काही अशी केली होती-आठवड्यातील दोन दिवस पोहणे, दोन दिवस धावणे, दोन दिवस कोअर वर्कआऊट आणि एक दिवस सायकलिंग. यासाठी आम्ही 2 प्रशिक्षक नेमले. एक स्विमिंग साठी आणि एक धावण्याच्या व कोअर च्या वर्कआऊट साठी.आमचा दिवस सुरू व्हायचा तो पहाटे साडेपाच वाजता. सकाळची आन्हिके उरकून सहा वाजता बरोबर मैदानावर जायचो. नऊ वाजेपर्यंत आम्हाला अक्षरशः पिळुन घ्यायचे. "घाम गाळणे" हा वाक्प्रचाराच मी शब्दशः ग्राउंडवर अनुभवला . नंतर प्रश्न होता पोहण्याच्या सरावाचा. कोरोनामुळे सगळे जलतरण तलाव बंद करण्यात आलेले. त्यामुळे आता पोहण्याचा सराव करायचा कुठे ? असा यक्ष प्रश्न उभा राहिला. पण म्हणतात ना "इच्छा तेथे मार्ग". यावर ही आम्ही उत्तर शोधून काढले. निगडी पासून साधारणपणे वीस किलोमीटर अंतरावर कासारसाई धरण आहे. त्या धरणावर पोहायला जाऊ लागलो. एक तास जाण्या-येण्यात आणि दोन तास पोहण्याचा सराव. बरेच जण गावाकडे पोचलेले असल्याने त्यांना पोहणे चांगले जमत होते. परंतु मला जे पोहणे यायचे ते आपले गावठी पोहणे. ज्यात थोडे अंतर गेले की लगेच धाप लागायची आणि मग पुन्हा किनारा जवळ करावा लागायचा. परंतु हळूहळू आमचे प्रशिक्षक अनिरुद्ध नामजोशी यांनी मला स्विमिन्ग मधील फ्रीस्टाइल प्रकार शिकवला,अंडरवॉटर ब्रीदिंग शिकवले. या दोन गोष्टींची जोड लाभल्यामुळे हळूहळू माझे स्विमिंग सुधारू लागले. धरणाच्या किनाऱ्यापासून साधारणपणे दोनशे मीटर अंतरावर एक फिश केज आहे. माझे इतर मित्र त्या फिश केज शिवून यायचं आणि अशा ते दोन दोन फेऱ्या मारून सराव करायचे. मी आपला काठावरच थोडे थोडे पोहून सराव करायचो. एकदा आमचे प्रशिक्षक मला म्हणाले "जा तू पण त्या फिश केज ला शिवून ये". त्यावर मी म्हणालो " काय? सर या अगोदर मी गटांगळ्या खाल्ल्या आहेत आणि बुडता बुडता वाचलोय. त्यामुळे एवढ्या लांब जाण्याची हिम्मत सध्यातरी माझ्यात नाही. आणि मला काही ते जमणार नाही". यावर प्रशिक्षक म्हणाले " चल मी येतो तुझ्याबरोबर". अशाप्रकारे मी माझी पहिलीवाहिली 400 मीटर ची फेरी त्यादिवशी साधारणपणे पस्तीस मिनिटात पूर्ण केली. हळूहळू सर्व वाढवला आणि पर्यायाने स्टॅमीना ही वाढू लागला.
स्पर्धेचा दिवस ठरला "14 मार्च". मार्च महिना म्हणजे टळटळीत ऊन. स्पर्धेचे स्वरूप म्हणजे पहाटे पाचला घरातून निघायचे. सहा वाजेपर्यंत कासारसाई ला पोहोचायचे. साडेसहा वाजता स्विमिंग सुरू करायचं. दोन किलोमीटर स्विमिंग झाले की 90 किलोमीटर सायकलिंग साठी शिरगाव तळेगाव वडगाव मार्गे लोणावळ्याला जायचे आणि पुन्हा त्याच मार्गाने परत निगडी ज्ञान प्रबोधिनी येथे यायचे. त्यानंतर प्राधिकरण भागातच 21 किलोमीटर अंतर धावायचे.
झालं!!! शेवटी उजाडला तो 14 मार्च चा दिवस. उद्या स्पर्धेच्या दिवशी काय होणार आणि कसे होणार या काळजी पोटी आदल्या रात्री झोपायला एक वाजला. आणि पहाटे उशीर होईल कि काय या भीतीने पुन्हा चार ला जाग आली.वेळ पाळत बरोबर सहा वाजता कासारसाई धरण येथे पोहोचलो. ठरल्याप्रमाणे साडेसहा वाजता स्विमिंग ला सुरुवात झाली. 400 मीटर ची पहिली फेरी दहाच मिनिटात पूर्ण झाली. पहिली फेरी पूर्ण करत असतानाच किनार्यावर आपल्या कॉलेजचे श्री रवंदळे सर,श्री नलावडे, श्री भसे,श्री विभुते,श्री टोपे आणि माझे काही मित्र अशी अनेक मंडळी मला प्रोत्साहन देण्यासाठी आले होते. पहाटे लवकर उठून फक्त आपल्यासाठी इथवर आलेली मंडळी पाहून आणखीनच उत्साह संचारला आणि पुढच्या चार फेऱ्या पण त्याच स्पीडने पूर्ण करत 50 मिनिटात पाण्यातून बाहेर आलो. सायकलिंग साठी तयार होण्यास सुरुवात केली. हा तयारीचा वेळही तुमच्या स्पर्धेच्या वेळात धरला जातो. त्यामुळे तयारी कमीत कमी वेळेत करायची होती. हे करत असताना मला माझ्या मित्रांची खूप मदत झाली. अक्षरशः एक घटना आवर्जून नमूद करावीशी वाटते. अंग पुसून मी कपडे घातले आणि सॉक्स घालताना पायाला माती लागली होती. त्या मातीतले दगड बुटात टोचतील म्हणून मी पाय पुसण्यासाठी साधे कापड मागितले. कापड तेथे उपलब्ध नव्हते तर वेळ वाया जाऊ नये म्हणून माझ्या मित्राने त्याच्या खिशातला रुमाल काढून मला दिला आणि म्हणाला "आनंद पूस पाय याने आणि निघ लवकर." बस्स!!! असे जिवलग मित्र हीच माझी खरी कमाई आहे.
पाण्यातून बाहेर पडल्यापासून 4 च मिनिटात आवरून मी सायकलला टांग मारली आणि लोणावळ्याच्या दिशेने निघालो. ज्ञानप्रबोधिनीचे इतर पालक आमच्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करत होते. जागोजागी पाणी, सरबत देण्यासाठी भर उन्हातही रस्त्याच्या कडेला थांबले होते. हे पाहून आणखीनच छान वाटले. या लोकांना आम्ही काही मोबदला देत नव्हतो. पण फक्त आपले मित्र काहीतरी पराक्रम करत आहेत, आपले सोबती काहीतरी वेगळं
करतायत आणि आपण त्यांना मदत करावी या सहकार्याच्या भावनेने आलेली ते सर्व. काही पालक तर स्विमिन्गसाठी स्वयंसेवक म्हणून होते. आम्ही साडेसहाला पोहायला सुरू करणार होतो. त्याअर्थी त्यांना अगोदर सेफ्टी प्रिकॉशन घेण्यासाठी म्हणून जी काही कामं करावी लागतात ती पार पाडण्यासाठी पहाटे पाच वाजता कासारसाई धरणाच्या जवळ पोहोचले होते. पहाटे पाच वाजता ते संध्याकाळी पाच असे बारा तास (आपली रविवारची सुट्टी घालवून) भर उन्हात आमच्या साठी उभे होते.स्पर्धा व्यवस्थापनाचा टॅन आमच्यावर येऊ नये यासाठी खायची प्यायची व्यवस्था त्यांनी त्यांचीच केली होती. ही निस्वार्थ भावना पाहून खरंच मनात उचंबळून आले होते. लोणावळ्यात पोहोचलो. तिथे वेळेची नोंद करून तिथून पुन्हा निगडीच्या दिशेने निघालो. वाटेत काही पालक आमचा हुरूप वाढवण्यासाठी वाटेत उभे होते. या आठवणी चिरकाल रहाव्यात म्हणून फोटो विडिओ काढत होते. चार तासात नव्वद किलोमीटर अंतर पूर्ण करत ज्ञानप्रबोधिनी,निगडी येथे पोहोचलो.
आता खरी कसरत सुरू होणार होती. दुपारचे साधारणपणे साडेअकरा वाजले होते. सूर्य डोक्यावर आला होता. ऊन भयानक तापले होते. स्विमिन्ग आणि सायकलिंग मुले चांगलीच दमछाक झाली होती आणि त्यानंतर अशा उन्हात 21 किलोमीटर धावायचे?? या विचारानेच डोळ्यासमोर काजवे चमकले. पण तरी आता भाग घेतलाय तर सोडायचं नाही आणि एवढी लोक आपल्यासाठी उभी आहेत त्यांचे कष्ट वाया जाऊ द्यायचं नाही हेच डोक्यात ठेवून पळायला सुरुवात केली. तिथे शाळेतील आई पालक आमच्या साठी धावण्याच्या मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी पाणी आणि इतर लागणाऱ्या गोष्टी घेऊन तयार होते. त्या भयानक उन्हात कसेबसे 21 किलोमीटर धावत सरतेशेवटी तीन वाजता मी स्पर्धा पूर्ण केली. आयुष्यातले हे "आठ तास बावीस मिनिटे" मी कधीच विसरणार नाही माझ्यासाठी हा एक अनमोल ठेवा आहे. ही स्पर्धा पूर्ण केल्यानंतर हा तर माझा आत्मविश्वास आणखीनच वाढला आहे. पोहण्याचे तर वेडच लागले आहे म्हणा ना. डिसेंबर पर्यंत आणखीन एक आहे आयर्नमॅन 70.3 आणि एखादी छोटी खाडी पोहण्याचा माझा मानस आहे. ठरवलेल्या ध्येय पूर्ती साठी तुमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा नेहमी पाठीशी राहोत, हीच एक प्रेमळ विनंती
Read More
"ते आठ तास बारा मिनिट"
प्रा आनंद बिराजदार